शुक्रवार, २६ जून, २०२०

विद्वान सर्वत्र पूज्यते

स्वगृहे पूज्यते मूर्ख:, स्वग्रामे पूज्यते प्रभु: ।
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते ।।

शाब्दिक अर्थ -
मूर्ख माणसाला त्याच्या स्वतःच्या घरात मान मिळतो. गावच्या नेत्याला गावात मान मिळतो. राजाला स्वतःच्या राज्यात मान मिळतो. विद्वान माणसाला जगभर मान मिळतो. 
भावार्थ -
विद्वात्तेला स्थळाच्या मर्यादा नसतात. म्हणूनच विद्वान माणसाला जगात कुठेही सन्मान मिळतो.


विद्वत्वं च नृपत्वं च न एव तुल्ये कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते ।।

शाब्दिक अर्थ -
विद्वान माणूस आणि राजा यांची तुलना होऊच शकत नाही. कारण राजाला स्वतःच्या राज्यात मान मिळतो, तर विद्वान माणसाला जगभर मान मिळतो. 
भावार्थ -
सांपत्तिक वैभवाला मर्यादा असतात पण विद्वात्तेला स्थळाच्या मर्यादा नसतात.

शरदि न वर्षति गर्जति

शरदि न वर्षति गर्जति वर्षति वर्षासु निःस्वनो मेघः |
नीचो वदति न कुरुते न वदति सुजनः करोत्येव ||

शब्दार्थ  - 

शरद ऋतु मधील मेघ हे पाऊस देत नाहीत पण खूप गर्जना करतात. वर्षा ऋतु मधील मेघ हे गर्जना करत नाहीत पण पाऊस देतात. 
दुर्जन व्यक्ति फ़क्त बोलतात पण करत काहीच नाहीत. सुजन व्यक्ति बोलत नाहीत करून दाखवतात. 

मराठी समानार्थी म्हण - 

गर्जेल तो बरसेल काय?

सोमवार, २२ जून, २०२०

अवयव - वाक्प्रचार / म्हणी

हातच्या काकणाला आरसा कशाला 
नाकी नऊ येणे 
मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये 


बडबडगीत - अवयव ओळख

लहान मुलांना अवयवांची ओळख करून देणारे सहज सुंदर बडबडगीत.. नवनीत च्या बडबड गीतांच्या पुस्तकात वाचलेले.. लहानपणी शिकलेले.. 

आता लहान मुले head - shoulder-knees and toes.. eyes ears mouth and nose.. हे rhyme म्हणत English मधून शरीराचे अवयव आणि त्यांची ओळख करून घेत असतात.. त्याच सोबत आपण हे बडबडगीत शिकवून मराठीत पण अवयवांची ओळख करून देऊ शकतो.. 


करंगळी मरंगळी 
मधलं बोट चाफेकळी 

तळहात मळहात 
मनगट कोपर 
खांदा गळगुटी हनुवटी 

भाताचं बोळकं 
वासाचं नळकं 

काजळाच्या डब्या 
देवाजीचा पाट 

देवाजीच्या पाटावर 
चिमण्यांचा किलबिलाट  


शुक्रवार, १९ जून, २०२०

शब्द संचय - अवयव

शब्द संचय - अवयव
डोके - शिर, मस्तक, माथा, शीर्ष
शरीर - अंग, धड, काया, तनू, तन, देह, वपू, कुडी
कपाळ - भाळ, निढळ, लल्लाट
डोळे - चक्षू, नयन, नेत्र, लोचन
बुबुळ - डोळ्याच्या मध्य भागातील गोलाकार रचना.
पापणी - डोळ्याच्या भोवतालचे केस 
नाक - नासिका
नाकपुडी -  नाकाचे दोन भाग 
नाकाचा शेंडा - नासिकाग्र 
तोंड - वदन, मुख, आनन, तुंड, जबडा
जीभ - जिव्हा
दात - दंत
सुळे 
दाढ - मागचे दात
अक्कलदाढ
दुधाचे दात - लहान बाळाचे दात. हे दात पडतात आणि मग परत दात येतात. 
टाळू  
कान - कर्ण, श्रवणेंद्रिय
हनुवटी - जिवणी
मान - गळा
हात - भुजा, हस्त, कर, बाहू
मनगट 
कोपर 
हृदय - काळीज
छाती - छाताड
पोट - उदर
कंबर -  कटी
पाय - चरण, पद
पोटरी 
घोटा 
गुडघा - ढोपर

५ बोटे - करंगळी, मरंगळी, मधलं बोट, चाफेकळी, अंगठा

शब्द संचय - भाज्या

डांगरी भोपळा - लाल भोपळा 
चक्की भोपळा - गोल पांढरा भोपळा 
बाची - गवार 
डामवे - शेवग्याची शेंग 
रातांबे - आमसुलाचे फळ 
कोकंब - आमसूल 

गुरुवार, १८ जून, २०२०

शब्द संचय - शेत

शेत

शेत - माळ, शिवार, वावर, क्षेत्र

शेतकरी - कृषिक, कृषिवल

जमीन - भुई, धरती, धरा, धरणी, धरित्री, पृथ्वी, वसुधा, मही

झाड - वृक्ष, तरू, पादप, विटप, द्रुम

वेल -  लतिका, लता, वल्लरी, वल्ली

पान - पत्र, पर्ण, पल्लव, दल

गोठा - गाई गुंरांची रहायची जागा

वेसण - गुरांना बांधायचा दोर

तोबरा - घोड्याच्या तोंडाला बांधलेला त्याचा खुराक

वाफा - भाज्या लावायचा छोटा भाग

कुंपण - शेता  भोवती बांधलेली भिंत, हद्द दाखवणारी भिंत

बळदा - शेतात धान्य जमवून ठेवायची खोली (ग्रेनरी) खुरपणी - धान्य पेरायच्या आधी जमीन खुरपून घेतात नांगरणी - नांगर लावून शेत नांगरून घेतात पेरणी - धान्य पेरायची वेळ कापणी - रोपे मोठी होऊन धान्याच्या ओंब्या लागल्या की कापणी करतात पाखडणी - कापणी झाल्यावर काढलेले धान्य पाखडून घेतात खळे मचाण - शेतात लांबवर लक्ष ठेवण्यासाठी उंच बांधलेली रचना बाव - विहीर मोट - बैलाच्या साहाय्याने विहिरीतून पाणी शेंदायची केलेली सोय तिफन बुजगावणे - शेतात पाखरांना उडवून लावण्यासाठी केलेला माणसासारखा मोठा आकार


शब्द संचय - गाव

गाव

शहर - नगर
गाव - ग्राम,

साकव - नदीवरील पूल

वेस - गावाची हद्द

हापसा - जमिनीतील पाणी उपसण्याचे हाताने चालवण्याचे यंत्र

वहिवाट - रोजची जाण्या-येण्याची वाट

मैदान - पटांगण - खेळायची मोकळी जागा

गावदेवी - ग्रामदैवत

पाडा - छोटीशी वस्ती

पार - मोठ्या झाडा भोवती बांधलेला दगडी कट्टा

शाळा - विद्यामंदिर, विद्यालय, न्यानमंदिर

देऊळ - देवालय, मंदिर, राऊळ

रान - जंगल

जत्रा - मेळा

बाग - बगीचा, वाटिका, उद्यान, उपवन

बुधवार, १७ जून, २०२०

स्वयंपाक घर - शब्द संचय

कणगी - धान्य साठवायला कुडाचे बांधलेले झाकणासहित पिप 
धुराडे / चिमणी - स्वयंपाक घरातील धूर बाहेर जाण्यासाठी केलेली झरोक्यासारखी रचना 
चुलीचा वैल - चुलीचा जाळ एका बाजूने बाहेर जातो त्याला वैल असे म्हणतात 
चूल ही तीन खुरांची असते. त्याच्या बाजूला चार खुरांची "वैल" असते. दोघांच्या मध्ये बोगद्यासारखा पोकळ भाग केलेला असतो. जेणेकरून चुलीतील जाळ त्या बोगद्यातून वैलाकडे गेला की त्या मंद आचेवर दूध किंवा भाताचे आधण ठेवले जाते, जे मंद आचेवर हळुवार शिजत राहते. 
चुलीला पोतेरे करणे - चूल सारवणे 
फुंकणी - लाकडाला जाळ लावण्यास/ हवा फुंकण्यासाठी वापरत असलेला पाईप सारखा तुकडा 
फडताळ - दही/दूध ठेवायचे लाकडी कपाट 
शिंकाळे - कांदे बटाटे ठेवायचे छताला तारेने टांगलेले भांडे 
ताटाळे - ताटल्या ठेवायचा स्टॅन्ड 
तांब्या फुलपात्र /लोटी भांड 
गंज - कढी / ताक करायचे उभट भांडे 
पेले - ग्लास 
गडू 
कळशी, हंडा  - विहिरीवरून पाणी आणायला वापरायचे / पाणी साठवायचे भांडे 
चिपटे - एक किलो चे मापटे 
जाते - दळण दळण्यासाठी वापरायचे दगडाचे यंत्र 
कांडप - मिरची / मसाला करताना कुटून पदार्थ बारीक करण्याची क्रिया 
उखळ - कांडप करायला वापरायचे यंत्र 
मुसळ - कांडप करायला वापरायचा कुटायचा दांडा 
खलबत्ता - छोट्या प्रमाणात कुटायचे यंत्र 
ताकाची मेढ - ताकासाठी रवी बांधतो तो मोठा लाकडी खांब 
चरवी - ताक करायचा छोटा हंडा 
पदार्थ कळकणे - आंबट पदार्थ पितळ्याच्या पातेल्यात ठेवल्यावर दूषित होण्याची रासायनिक क्रिया 
पाटा वरवंटा - वाटण करण्यासाठी दगडाचा पाट असतो तो पाटा आणि आणि रगडायचा असतो तो वरवंटा 
भातवाडी /हात - भात वाढायचा हाताच्या आकाराचा चमचा 
काताणे - करंजी ची कड कातरायची फिरकी
ओगराळे - माठातून पाणी घेण्यासाठी किंवा मोठ्या पातेल्यातून पातळ पदार्थ घेण्यासाठी मूठ असलेले आणि पुढे खोलगट आकार असलेले 
पंचपाळे - चटण्या, कोशिंबीरी, लिंबू असे छोटे प्रकार एकाच वेळी वाढायला नेण्यासाठी चार वाडगे आणि त्याला मूठ असलेले भांडे 
मसाल्याचे पंचपाळे - तिखट, हळद, मोहरी, जिरे ठेवायचा डबा 
उलथने - धिरडी पलटायला, भाजायला असे पुढे चपट्या आकाराचे चमचे 
डाव - पातळ पदार्थ वाढायला खोलगट चमचा 
पळी - डावपेक्षा थोडे उथळ चमचे 
मूद पाडणे 
थाळा - कड असलेली ताटे 
परात - कणिक मळायला वापरायचे कड असलेले भांडे 
काथवट - लाकडी परात 
ताट - जेवायला घ्यायचे भांडे 
वाटी - पातळ पदार्थ पानात घेण्यासाठी गोलाकार खोलगट भांडे 
फिरकीचा तांब्या - प्रवासात पाणी नेण्यासाठी फिरकीचे झाकण व कडी असलेला तांब्या 
तबक - पान, सुपारी, लवंग, वेलची ठेवलेले ताट   
रोळी -धान्य रोळून खडे वेगळे काढायला वापरायचे पात्र 
चाळणी - धान्य / पीठ चाळायला वापरायचे पात्र 
दुरडी - धुतलेले जिन्नस ठेवायला वापरतात टोपली सारखी विणलेली असते 
धान्य मापण्याची मापे - निठवे, अधोली, पायली, फरा 
भुई घेणे - अंगण किंवा ओटा पूर्ण खोदून ती माती एकसारखी करून पुन्हा सपाट करून पाणी टाकून चोपण्याने चोपून एकसारखी करणे. 
चोपणे- हे कपडे धुवायच्या धोक्यासारखे लाकडी असते. बॅट सारखा आकार पण थोडे जाड आणि लाकडी 
सरपण - जळाऊ लाकडे 
भुश्याची शेगडी - लाकडाचा भुसा सरपण म्हणून वापरात येणारी शेगडी 
निखारे - कोळसा पेटल्यावर तयार होणारे व धग देणारे

सोमवार, १५ जून, २०२०

पाऊस - शब्द संचय

पाऊस हा प्रत्येकाचा लिहायचा, अनुभवायचा विषय आहे.. काय आठवत पाऊस म्हणल्यावर?  आम्हाला शब्द संचय करताना पाऊस म्हणल्यावर हे शब्द आठवले.. तुमचे काय? वाचून कसे वाटले प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा आणि अजून असेच छान छान शब्द आमच्या संचयात जोडायला सुचवत रहा.. 

  1. नव्हाळी - पानाफुलांचा पहिला बहर 
  2. मोराचे केकारव - मोराचा आवाज 
  3. बेडकाची डराव डराव 
  4. मृदगंध - मातीचा सुवास 
  5. पागोळी - गच्चीत साठलेले/कौलांच्या पन्हळीतून खाली पडणारे पावसाचे पाणी 
  6. आभाळ येणे/ शिराळ पडणे - ढगाळ वातावरण
  7. तिरीप - पावसाचे घरात येणारे पाणी 
  8. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट 
  9. वीज - विद्युल्लता 
  10. इरले - कुंची सारख्या आकाराचा रेनकोट. हे इरले शेतीची पावसाळ्यातील पेरणी करताना, भात लावताना जास्त वापरतात.  

  • पावसाची नक्षत्रे आठवली असतील - मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त

  • पाऊस कसा पडतोय तुमच्याकडे?
  1. रिमझिम / झिमझिम / रिपरिप 
  2. संततधार 
  3. मुसळधार 
  4. सरीवर सरी 
  5. श्रावण सरी 
  • पावसाचे राग  - मल्हार वर्ग 




घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् / घट फोडावे तट फाडावे

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम् |
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ||

या संस्कृत सुभाषिताचे भाषांतर एका मराठी सुभाषितात केलेले आढळते.. ते सुभाषित खालील प्रमाणे.. 

घट फोडावे तट फाडावे घे चिंध्यांचा भार ।
काढुनी गर्धभ महाध्वनी ते जमवावा बाजार ।। 

मडके(घट) फोडावेत.. कापड (पट) फाडावे.. गाढवावर(रासभ) बसावे.. या ना त्या प्रकारे माणसाने प्रसिद्ध  व्हावे..  

रविवार, १४ जून, २०२०

वाक् प्रचार संचय

वाक् प्रचार संचय

निरक्षीर विवेक - चांगले वाईट ओळखण्याची बुद्धी - हंसाला पाण्यातून दूध वेगळं करता येत असा संस्कृत सुभाषितात उल्लेख आहे.


कासवीची दृष्टी - कृपा दृष्टी - कासावीच्या पिल्लाचे पोषण तिच्या केवळ दृष्टी क्षेपानेच होते असे म्हणतात. तिला दूध येत नाही तरी केवळ तिच्या ममतेने पिल्लांची वाढ होते.


कासवीचे तूप- असंभवनीय गोष्ट - कासावीला दूध नसते त्यामुळे नसेल तर तूप कुठले?


तक्षकाच्या फणीतील मणी - अप्राप्य वस्तू -  नागाच्या डोक्यात मणी असतो असा कवी संकेत आहे. तक्षक हा नागांचा राजा असल्याने त्याच्या डोक्यातील मणी काढून घेणे ही अशक्य गोष्ट.  


निंबलोण उतरवणे - कडुनिंबाची पाने, मीठ, मोहरी इत्यादी पदार्थ भोवती ओवाळून दृष्ट काढणे.


माथा हुंगिला - पुत्रवत प्रेम केले -  वडील आणि मूळ मध्ये प्रेम दर्शविण्याची पद्धत. पूर्वी वडील मुलाचे कौतुक करायचे वेळी, भेटीच्या किंवा निरोपाच्या वेळी मस्तक हुंगीत असे.

  

अष्ट दिग्गज - पृथ्वीच्या आठ दिशास राहून तिला आपल्या डोक्यावर उचलून धरणारे आठ हत्ती. (पुराणातील उल्लेख)


खाराची पुटे - झळाळी देणे, चमकावणे -सोन्याला उजाळा देण्यासाठी सोरा या खाराचा उपयोग करतात. त्यामुळे सोने अधिकाधिक तेजस्वी दिसू लागते.


पाचवीला पूजणे - एखाद्या गोष्टीचा सतत त्रास होणे - लहान मूल जन्मल्यावर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पूजा करून दिवा लावून ठेवतात. जेणेकरून सटवाई बाळाला त्रास द्यायला आली तर निघून जाईल. ह्यावरून एखाद्या गोष्टीचा सतत त्रास होत असल्यास पाचवीला पूजणे असे म्हणतात. "गरिबी त्याच्या पाचवीला पुजलेली होती. - तो खूप गरीब होता."


अठरापगड - निरनिराळ्या तर्हेची माणसे - "गावाच्या जत्रेच्यावेळी अठरापगड माणसे भेटतात."


त्रिवेणी संगम - तीन प्रकारच्या गोष्टींचा मेळ - तीन नद्यांचा संगम

शनिवार, १३ जून, २०२०

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: / हंस: श्वेत: बक: श्वेत:

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेदो पिककाकयो: ।
वसंतसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ।।

हंस: श्वेत: बक: श्वेत: को भेदो बकहंसयो: ।
नीरक्षीर विवेके तू हंस: हंस: बक: बक: ।।

ही दोन्ही समानार्थी सुभाषिते आहेत.. 

शब्दार्थ - 

कावळा पण काळा असतो आणि कोकीळ(पिक) पण काळा असतो.. कावळा आणि कोकीळ यात फरक काय? वसंत ऋतू चे आगमन झाले की कळते .. कावळा कावळा असतो आणि कोकीळ कोकीळ असतो.. 

हंस सफेद असतो आणि बगळा सफेद असतो.. हंस आणि बगळ्यात फरक काय? जेव्हा दूध (क्षीर) आणि पाणी (नीर) वेगळे करायची वेळ येते तेव्हा कळते हंस हंस असतो आणि बगळा बगळा असतो.. 

भावार्थ - 

बऱ्याच वेळा माणसाची पारख ही निर्णायक परिस्थिती येते तेव्हाच होते..  

दुरस्थाः पर्वताः रम्याः

दुरस्थाः पर्वताः रम्याः वेश्याः च मुखमण्डले | युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दूरतः || अर्थ - दुरून डोंगर साजरे दिसतात आणि चेहरा सजवलेल...